सिंधुदुर्ग - कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे आरटीपीसीआर मशीन जिल्हा रुग्णालयात धूळ खात पडले आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी आज कणकवली येथे बोलताना केला आहे. 'कोविड-१९ चे स्वॅब टेस्ट मशीन सिंधुदुर्गात आहे, हे पालकमंत्र्यांना माहितीच नाही. सिव्हिल सर्जन डॉ. धनंजय चाकोरकर यांनी या टेस्टिंग मशीनची माहिती प्रशासनाला दिली आणि पालकमंत्र्यांना दिलीच नाही. त्यामुळे जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले आहे,' असा गंभीर आरोप तेली यांनी केला आहे.
'कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे आरटीपीसीआर मशीन जिल्हा रुग्णालयात आहे. हे मशीन वापरण्यासाठी मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इतर स्टाफ, सुसज्ज प्रयोगशाळा लागते. ती पडवे येथील खासदार नारायण राणे यांच्या एस.एस.पी.एम. वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे. हे मशीन मेडिकल कॉलेजमध्ये बसवून तेथील अत्याधुनिकत्याचा लॅबचा वापर केला जावा, यासाठी खासदार नारायण राणे यांनी परवानगी दिली होती. हे स्वॅब टेस्ट मशीन आज जनतेच्या हितासाठी सुरू होणे गरजेचे आहे. या मशीनचा वापर केल्यास जिल्ह्यातील रुग्णांचे कोरोना तपासणीसाठीचे स्वाब नमुने मिरज आणि गोव्याला पाठवावे लागणार नाहीत. याचा जिल्ह्याचा फायदा होणार होता. मात्र, सत्ताधारी पक्ष आणि पालकमंत्री यासाठी काहीच करत नाहीत. ते केवळ राजकारणासाठी जनतेच्या जिवाशी खेळ करत आहेत,' असा आरोप तेली यांनी केला.
'सध्या मिरजने कोरोना चाचणी करून देण्याबाबत हात झटकले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात सर्व स्वॅब टेस्ट मशीनसह सर्व सुविधा आहेत. त्याचा उपयोग करून जिल्ह्यातच प्रयोगशाळा उभारणे शक्य होते. मात्र, सत्ताधारी पक्ष आणि पालकमंत्री असे करण्यास तयार नाहीत. त्यांनी राजकारण जरूर करावे, पण आज ती वेळ नाही. राजकारण करत पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या जनतेचे नुकसान करू नये. राजकारणापलीकडे जाऊन जिल्ह्यातील जनतेशी असलेली बांधिलकी जपा,' असा सल्ला भाजपचे तेली यांनी दिला. यावेळी नगरसेवक बंडू हर्णे, शिशिर परुळेकर उपस्थित होते.
'राणेंच्या रुग्णालयात ही टेस्ट झाली तर जिल्हावासियांना अवघ्या तासाभरात स्वॅब चाचणीचे अहवाल मिळाले असते. रत्नागिरीत दोन तासांत अहवाल पोचले असते. मिरज, गोवा येथे दिवसाला चार गाड्या तपासणीसाठी नमुने घेऊन जातात. तो खर्च वाचला असता. राणे कुटुंबीय सिंधुदुर्गवासियांच्या हितासाठी सर्व प्रकारची मदत करायला तयार होते. माझे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणे झाल्यानंतर खासदार राणे यांच्यासोबतही बोलणे झाले होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या काही लोकांचे राजकारण आडवे आले,' असे तेली म्हणाले.
'तळकोकणात चाकरमान्यांचे लोंढे येऊ लागले आहेत. कोरोनाच्या तपासणीसाठी सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा कवमकुवत आहे. भविष्यात रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्गात हाहाकार माजू शकतो. मिरजने कोकणातील स्वॅब टेस्ट करून देण्यात नकार दिला आहे. पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली होती. मात्र, गोव्याच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रादेवीत बैठक घेतली तेव्हा आम्हालाच डावलले असा आरोप श्री. तेली यांनी केला. सत्ताधाऱ्यांना राजकारण सुचते आहे,' असे राजन तेली यावेळी म्हणाले.
'जिल्हा बँकेसह पुढील निवडणुका महाविकास आघाडीद्वारे लढण्याचा निर्णय घेता. तालुकानिहाय कमिटी स्थापन करता. ही प्रवृत्ती घातक आहे. जनता कोविडने होरपळत असताना राजकारण कसले करता,' असा सवालही भाजप जिल्हाध्यक्ष तेली यांनी केला.