सिंधुदुर्ग - भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून आहे. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने या मोहिमेला १०० टक्के यश येऊ शकले नाही. इस्रोसह देशवासीयांना विक्रमशी संपर्क होईल, अशी आशा आहे. यातच वेंगुर्लेतील आरवलीच्या वेतोबाने देखील उजवा कौल दिल्याने विक्रमशी संपर्क होईल, असा दावा देवस्थानने केला आहे.
आरवलीतील वेतोबा हे वेंगुर्ले तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी विक्रम लँडरचा पुन्हा संपर्क होईल का? असा कौल घेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे देवस्थानचे विश्वस्त डॉ. प्रसाद साळगावकर यांनी वेतोबाला कौल लावला. यावेळी वेतोबाने उजवा कौल दिल्याने संपर्क होणार असल्याची खात्री दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -विक्रम लँडरची स्थिती लवकरच समजेल..!
वेतोबाकडे लावलेला कौल खोटा ठरत नाही, असे श्रद्धाळू सांगतात. वेतोबा मोठ्या चपला घालून गावाचे रक्षण करण्याकरीता फिरतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आरवलीच्या वेतोबाला नवस म्हणून देवळात ठेवलेल्या चपला आपोआप घासल्या जात असल्याचे पहायला मिळते. त्यामुळेच वेतोबाने दिलेल्या कौलानुसार विक्रमशी संपर्क होणार असल्याचा दावा देवस्थानाकडून केला जात आहे. या दाव्यामुळे मात्र कमालीची उत्सुकता वाढलेली आहे.
हेही वाचा -'विक्रम' हे तिरक्या अवस्थेत, मात्र सुस्थितीत - इस्रो
अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करा, विज्ञानवाद्यांचे आवाहन
दरम्यान चांद्रयान-२ मोहीम यशस्वी होण्यासाठी देशभरात पूजा, होम-हवन केले गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता विक्रम लँडरशी संपर्क व्हावा, तसेच ही मोहीम पूर्णपणे यशस्वी व्हावी यासाठी देवाचा धावा केला जात आहे. तर विज्ञानवाद्यांकडून अशा अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा -अंधश्रद्धेचा कळस! पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट