सिंधुदुर्ग - नाबार्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामार्फत राबवला जाणारा नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन (UPNRM) हा देशातील पहिला प्रकल्प आहे. यामध्ये बायोगॅस, दुग्धव्यवसाय, गांडूळ खत, सेंद्रीय शेती, कुक्कुट पालन यासाठी नाबार्डमार्फत जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा केला जातो. तसेच शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय, शेती इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रकल्प हा जिल्हा बँकेकडून यशस्वीरित्या राबवण्यात आला असून , त्याची दखल नाबार्ड, जीआयझेडने घेतली आहे.
हेही वाचा - शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
दरम्यान, असा प्रकल्प अन्य देशात राबवण्यासाठी जीआयझेडने आफ्रिकेमधील निवडक बँक प्रतिनिधींची जिल्हा बँकेस तसेच प्रकल्प राबवलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रकल्प यशस्वी होण्यामागची कारणे अभ्यासण्यासाठी सदर टीमने भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देऊन एनजीओ व बँकेस झालेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायद्याबाबत चर्चा केली.
प्रकल्पाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून जिल्हा बँक व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमात जीआयझेडचे प्रतिनिधी विकास सिन्हा तसेच दक्षिण आफ्रिकेचे बँक प्रतिनिधी उपस्थित होते. बँकेमार्फत बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहीती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले. आफ्रिकन बँक प्रतिनिधीनीही असा प्रकल्प आपल्या देशात आपण नक्की राबवू, असा विश्वास व्यक्त केला.