सिंधुदुर्ग - पाच हजारांची लाच स्वीकारताना एका तलाठीला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. मालवण तालुक्यातील त्रिंबक येथे तो तलाठी कार्यरत आहे. भरत दत्ताराम नेरकर असे त्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. सातबारा उताऱ्यावर झाडांची नोंद घालण्यासाठी त्याने ५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपतच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
कुडोपी येथील संबंधित तक्रारदाराने त्यांचे व्यावसायिक मित्र प्रभाकर परब यांच्याकडून झाडे विकत घेतली. त्या झाडांची नोंद सातबारावर नव्हती. या झाडांची नोंद सातबारावर करण्यासाठी त्रिंबक यांना तलाठी नेरकर याने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला दिली. त्यानुसार सोमवारी लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला. लाचखोर तलाठी भरत नेरकर याने तक्रादाराकडून ठरल्याप्रणे मागितलेली पाच हजाराची रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून स्वीकारलेली लाचेची रक्कम देखील हस्तगत करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक मितीश केणी, जनार्दन रेवंडकर, नीलेश परब, पोलीस शिपाई खंडे, पोतनीस यांच्या पथकाने केली. सायंकाळी आचरा पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात आली. दरम्यान लाचखोर तलाठी भरत नेरकर याला अटक करून कुडाळ येथे नेण्यात आले आहे. आज मंगळवारी १९ ला नेरकर याला ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.