सिंधुदुर्ग - दहावी शालांत परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सिंधुदुर्गात अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. पंरतु या यशस्वीतेत लक्ष वेधणार यश मिळविले आहे ते कोमल ज्ञानेश्वर इंगळे या विध्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थीनीने. एप्रिल-मे मध्ये फळे विकून आणि आता हातगाडीवर मक्याची कणसे विकून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुळीचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या यशाला गरिबीची, कष्टाची आणि जिद्दीची किनार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात कोमल ज्ञानेश्वर इंगळे या विद्यार्थिनीने मेहनत आणि चिकाटीने ७३ टक्के गुण प्राप्त केले आहे. या यशाने हरखून न जाता आजही कोमल मक्याची कणसे हातगाडीवर मिळालेल्या यशाच्या आनंदाने विकत आहे.
कोमलचे आई-वडील बुलडाणा जिल्ह्यात आपल्या गावी गेलेत ते तिथेच अडकून पडले आहेत. मात्र, जेव्हा उपासमार होणार हे लक्षात येताच कोमलने वडिलांची फळविक्रीची हातगाडी नरडवे रोडवर लावली. आता पावसाळी हंगाम सुरू झाल्यावर कोमलने नरडवे नाक्यावर भाजलेली मक्याची कणस विकायला सुरूवात केली. सध्या तिच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कोमलने आज लागलेल्या दहावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण मिळविले आहेत. कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये ती शिकते. भविष्यात आयपीएस बनण्याचे कोमलचे स्वप्न आहे. त्यासाठी ती आत्तापासूनच परिश्रम घेत असून तिची जिद्द आणि चिकाटी तिला या शिखरावर नक्की नेणार असे भाव कोमलने व्यक्त केले.