सिंधुदुर्ग - अवैध मच्छिमारी आणि मत्स्य दुष्काळाने होरपळलेल्या सिंधुदुर्गातील मच्छिमारांसाठी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाने घेतले जाणारे मत्स्योत्पादन वरदान ठरत आहे. या तंत्रज्ञानात खाडी किंवा समुद्राच्या पाण्यात मत्स्योत्पादन न करता मोकळ्या जागेत जाळीच्या सहाय्याने प्लास्टिक आवरण घालून टाक्या बनवल्या जातात. त्यात मत्स्यपालन केले जाते. महत्त्वाचे म्हणजे या टाक्यांमध्ये एकदा भरलेले पाणी बदलले जात नसल्याने पाण्याची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान कोणत्याही प्रदेशात बेरोजगारांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. मालवण तालुक्यातील आचरा येथे एका 'मुंबई रिटर्न' चाकरमानी तरुणाने हे मत्स्यपालनकरून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराचा एक नवा मार्ग दाखवून दिला आहे.
मुंबईसारख्या झगमगत्या शहरात जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेला भगवान आडवलकर हा तरुण मत्स्य शेतीबाबत निर्माण झालेल्या आकर्षणातून गावी आला. मुंबईतील नोकरी सोडून मत्स्य शेतीबाबत माहिती मिळवण्यासाठी त्याने दिल्ली-उत्तरप्रदेश-सोलापूर वारी करत 'बायोफ्लॉक तंत्रज्ञान' वापरून आचरा या गावी 'अश्विन बायोफिश फार्म' या नावाने या मत्स्यपालन प्रकल्पाला सुरुवात केली.
साधारण अडीच ते तीन गुंठे क्षेत्रात त्याने लोखंडी जाळ्या आणि ताडपत्रीचा आधार घेऊन सहा टाक्या बांधल्या. यात पाणी साठवून ठेवण्यासाठी प्लास्टीक आवरणही घातले. सहा मीटर घेराच्या आणि तीन फूट उंचीच्या या एका टाकीत साधारण तीस हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या टाकीत एकाच वेळी तीन हजार माशांच्या पिल्लांची पैदास होऊ शकते. 'मत्स्यपालनाची ही पद्धत इस्रायलमधून आली आहे. सध्या इंडोनेशियात या प्रकाराने मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन केले जात आहे. 'केज कल्चर'प्रमाणे तलाव, खाडी, समुद्राच्या पाण्याची बायोफ्लॉकमध्ये आवश्यकता नसल्याने आपल्या परसातील जागेतही या प्रकाराने मासेपालन करू शकतो, अशी माहिती भगवान आडवलकर यांनी दिली.
टाकीत एकदा भरलेले पाणी मासे वाढण्यासाठी लागणाऱ्या सहा-सात महिन्यांच्या कालावधीत बदलावे लागत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटतो. रोज टाकीच्या तळाला जमा झालेली माशांची विष्ठा आणि खराब पाणी टाकीमध्ये बसवलेल्या पाईपमधून बाहेर सोडले जाते. त्यानंतर आवश्यक तेवढेच पाणी या टाकीत भरले जाते. बायोफ्लॉकमध्ये कोळंबीसह अनेक प्रकारचे मासे वाढवले जाऊ शकतात. आडवलकर यांनी त्यांच्या प्रकल्पात 'तिलापिया' जातीच्या माशांची पैदास केली आहे. हा प्रकल्प बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा असल्याने ज्यांना या प्रकारे मत्स्यपालन करण्याची ईच्छा असेल. त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारीही आडवलकर यांनी दाखवली आहे. सध्या काही जणांना ते ऑनलाईन मार्गदर्शनही करत आहेत.
सध्या महाराष्ट्रात या प्रकारचे मत्स्यपालन खासगी गुंतवणुकीतून केले जात आहे. यासाठी काही खासगी संस्थांकडून प्रशिक्षण दिले जाते. इतर राज्यात पंतप्रधान योजनेअंतर्गत या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. मात्र, महाराष्ट्रात अजून या प्रकारच्या मत्स्यपालनास शासन मान्यता मिळाली नसल्याचे आडवलकर यांनी सांगितले. बायोफ्लॉक तंत्रज्ञानाने मत्स्यपालनास शासन मान्यता दिली आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात याचा समावेश केल्यास तरुणांसाठी फायद्याचे ठरेल, असे आडवलकर यांचे मत आहे.