सातारा : मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या तरूणावर गावातीलच एका २२ वर्षीय तरूणाने कोयत्याने सपासप वार करुन त्याची हत्या केल्याची ( stabbed to death by a coyote ) घटना कराड तालुक्यातील जुळेवाडी येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. राजवर्धन महादेव पाटील (वय २४), असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, हल्ला करून पळून गेलेल्या विजय बाबुराव काशीद या संशयिताला पोलिसांनी चोवीस तासात अटक केली आहे.
वाढदिवसाच्या कार्यक्रमातच हल्ला - राजवर्धन महादेव पाटील हा आपल्या जुळेवाडी गावातील पुजारी चौकात राहणाऱ्या मित्राच्या वाढदिवसाला गेला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच संशयित विजय बाबुराव काशीद तेथे आला. काही कळायच्या आत त्याने कोयत्याने राजवर्धनवर सपासप वार केले आणि पळून गेला. जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजवर्धला कृष्णा रूग्णालयात घेऊन जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
संशयिताला चोवीस तासात अटक - तरूणावरील हल्ल्याची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम, अमोल पवार, सचिन गुरव, संजय काटे यांनी संशयित विजय बाबुराव काशीद यास शेरे (ता. कराड) येथे ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.