सातारा - सध्या देशभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, काही बांधकामांना शासनाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामाला देखील परवानगी दिल्यामुळे काम चालू झाले आहे. मात्र, गेले महिनाभर काम बंद असताना याठिकाणी एक ही कामगार नव्हता. मग हे कामगार नक्की गेले कुठे होते, आणि आता अचानक कामावर आले कुठून? असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांना पडले आहेत.
म्हसवड, निढळ, पुसेगाव, पिंगळी या गावामध्ये हे परप्रांतीय कामगार विखुरले आहेत. मात्र, ते राहतात कुठे आणि कुठून येतात याचा थांग पत्ता देखील प्रशासनला लागू दिला जात नाही आहे. जिल्हाधिकरी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भीती स्थानिक प्रशासनाला घातली जात असल्याची चर्चा देखील होत आहे. या कामावर शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन ठेकेदार व कामगार यांच्याकडून होताना दिसत नाही. ना मास्कचा वापर, ना कोणत्याही प्रकारची स्वच्छता. यामुळे महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.