कराड (सातारा) - तालुक्यातील कासारशिरंबे गावात विवाहित मावशीकडे आलेल्या विवाहीतेने पोटच्या आठ महिन्यांच्या मुलासह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काळीज पिळवटून टाकणार्या या घटनेमुळे कासारशिरंबे गावात एकच खळबळ उडाली. मुलासह आत्महत्या केलेली विवाहिता मूळची सांगली जिल्ह्यातील कडेगावची आहे. राजश्री शंकर रासकर (वय 23 वर्षे) व शिवतेज (वय 8 महिने), अशी त्यांची नावे आहेत.
कासारशिरंबे (ता. कराड) गावातील पालकराचा मळा नावाच्या शिवारात रात्री उशीरा ही घटना घडली असून मंगळवारी (दि. 22 जून) सकाळी ती उघडकीस आली. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. नेर्ले (ता. वाळवा, जि. सांगली) हे राजश्री हिचे माहेर तर कडेगाव (जि. सांगली) हे तिचे सासर आहे. कडेगावहून ती सोमवारी (दि. 21 जून) दवाखान्यात जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावातील मावशीच्या घरी आली. पण, मावशीकडे न जाता तिने आठ महिन्याच्या मुलाला पोटाला बांधून विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.
मृतदेह दिसले तरंगताना
मंगळवारी सकाळी रानात जाणार्या नागरिकांना विहिरीकडे जाणार्या पाऊल वाटेवर लहान मुलाची दुधाची बाटली, दुपटे तसेच विहीरीच्या काठावर एक पिशवी दिसली. शंका आल्यामुळे नागरीकांनी विहीरीत डोकावून पाहिले असता दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरीकांनी कराड ग्रामीण पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्यावर तरंगणारे मृतदेह विहीरीतून बाहेर काढले. पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.
कासारशिरंबेत झाले होते प्राथमिक शिक्षण
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशी दरम्यान विवाहीता ही कडेगाव (जि. सांगली) येथील असून ती मावशीकडे आली होती. तसेच तिचे बालपण कासारशिरंबे येथे गेले असून तिचे प्राथमिक शिक्षणही कासारशिरंबे गावात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह सांगली जिल्ह्यातील कडेगावातील मुलाशी झाला होता. तिच्यावर सध्या उपचार सुरू होते. दवाखान्यात जाते, असे सांगून ती सोमवारी सकाळी कडेगावातील घरातून ती बाहेर पडली होती. दवाखानात न जाता ती मावशीच्या कासारशिरंबे गावी गेली. पण, मावशीकडेही न जाता तिने आठ महिन्यांच्या मुलासह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे हे या घटनेचा तपास करत आहेत.
हेही वाचा - 'ई टीव्ही भारत विशेष'; 'चढणी'चे मासे पकडल्याने 'जैव साखळी धोक्यात', 'असा' होतो परिणाम