कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने शनिवारी सकाळी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील पाण्याच विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणातील पाणीपातळी 2162 मीटर 1 इंचावर असून 103.40 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कोयनानगर, नवजा येथे पावसाने पुर्णत: विश्रांती घेतली आहे. तसेच महाबळेश्वर पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक घटली आहे. परिणामी पायथा वीज गृहातून होणारा पाण्याच विसर्ग पुर्णता थांबविण्यात आला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठ दिवसांत जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले होते. तसेच पायथा वीजगृह कार्यान्वित करून प्रतिसेकंद 50 हजार क्यूसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. मात्र, सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 16) धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले होते. परंतु, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. आता पाऊस पूर्णत: थांबल्याने आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता पायथा वीजगृह बंद करण्यात आले असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
103 दिवसात 5 हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस
कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तीन प्रमुख पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 1 जून ते 9 सप्टेंबर या 103 दिवसांच्या कालावधीत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 3 हजार 896 मिलीमीटर, नवजा येथे 5 हजार 154, महाबळेश्वर येथे 5 हजार 157, जोर येथे 6 हजार 520 आणि वळवण येथे 5 हजार 914 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - उदयनराजेंच्या पाठोपाठ संभाजी भिडेगुरुजी एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क