सातारा - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय अधिकारी विनय गौडा आज (गुरुवारी) पदभार स्वीकारणार आहे. ते संजय भागवत यांची जागा घेतील.
सातारा जिल्हा परिषदेने विविध अभियान, उपक्रमात राज्य तसेच देशपातळीवर नावलौकिक केला आहे. या पाठीमागे पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. आतापर्यंतच्या सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या योगदानात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आपल्या 14 महिन्यांच्या अल्प कार्यकाळात जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढेल असेच काम केले. त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती झाली आहे.
2015च्या बॅचचे आयएएस अधिकारी गौडा हे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे गाव मद्दुर तालुक्यातील गुरूनल्ली आहे. गौडा यांनी नाशिक येथे प्रोबेशनरी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि त्यानंतर ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. फेब्रुवारी 2019पासून ते तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.