सातारा - लॉकडाऊनमुळे गेले आठ महीने बंद असलेले महाबळेश्वर येथील वेण्णालेक बोटक्लब पालिकेच्या वतीने पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी नौकाविहारासाठी आलेल्या पर्यटकांचे पालिकेच्या वतीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह पालिकेचे लोकप्रतिनिधी व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सशर्त वेण्णालेक बोटक्लब पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पालिकेने प्रवेश व बाहेर जाण्याचे दोन मार्ग केले आहेत. पहिल्याच दिवशी आलेल्या पर्यटकांचे पालिकेच्या वतीने फुले देवून स्वागत करण्यात आले. तसेच, त्यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला. या वेळी पालिकेच्या वतीने पेढे वाटून सर्वांचे तोंडही गोड करण्यात आले.
प्रथम बोटींची विधिवत पुजा करण्यात आली. फुलांनी सजवलेल्या बोटी घेवून पर्यटकांनी वेण्णालेक येथे नौकाविहाराचा मनमुराद आनंद लुटला. नौकाविहार करून पर्यटक परत गेल्या नंतर बोटींचे पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात आले. बोटक्लब सुरू करण्यापूर्वी पालिकेने सर्व परिसराची स्वच्छता करून परिसर निर्जंतुक केले होते. सर्व बोटी साफ करून त्यांच्यावर औषध फवारणी करण्यात आली होती. दोन पर्यटकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत होते. प्रवेश द्वारावर पर्यटकांचे ऑक्सिजन व तपमान घेण्यात येत होते. तसेच, त्यांचे नाव व पत्त्याची नोंद केली जात होती.
हेही वाचा- सातारा : रेवंडे गावाजवळ कोसळला अडचणींचा 'डोंगर'; प्रशासन अद्याप कुंभकर्णीय निद्रेत