सातारा - संभाजीराजे माझे बंधू आहेत, ते कधीही भेटू शकतात. येत्या काही दिवसांत माझी आणि त्यांची भेट होईल, त्यातून चांगला मार्ग निघेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट होणार होती. परंतु, ती आज झाली नाही. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
'दोघांची भेट आंदोलनाचा भाग'
खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंबंधी आक्रमक झाले असून, त्यांनी रायगडावरुन आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ते खासदार उदयनराजे यांची भेट घेणार आहेत. मात्र, उदयनराजे व्यग्र असल्याने ही भेट होऊ शकली नाही. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, उदयनराजे म्हणाले, संभाजीराजे माझे बंधू आहेत, ते कधीही मला भेटू शकतात. माझे घर हे त्यांचे घर आहे. ते कधीही येऊ शकतात.
'ते माझे बंधू आहेत'
संभाजीराजे यांनी कोल्हापुरात १६ जूनला मोर्चा नाही, तर मूक आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आज पुणे किंवा साताऱ्यात संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट होईल, असे बोलले जात होते. मात्र, आज ही भेट झाली नाही. उदयनराजे यांची पूर्वनियोजित बैठक असल्याने ते भेटू शकले नाहीत. ते म्हणाले, माझ्या अगोरदच काही भेटीगाठी ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडीयाच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी आज महत्त्वाची बैठक होती. माझ्या पूर्वनियोजित भेटी असल्याने आज आमची भेट होऊ शकली नाही. मात्र, ते माझे बंधू आहेत. ते कधीही येऊ शकतात असेही ते म्हणाले.
'लाँग मार्च' सरकारला परवडणारा नाही'
संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्ट करून 'ही वादळापूर्वीची शांतता आहे'. कुणीही समाजाला गृहीत धरू नये. आम्ही जिल्ह्या-जिल्ह्यात केवळ बैठका, चर्चा करतोय असे नाही. काही दिवसांत पुणे ते मुंबई या 'लाँग मार्च’ची तयारी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात तयारीच्या बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकारला परवडणारा नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.