कराड (सातारा) - कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांकडून मोटरसायकल चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. कराड शहर हद्दीतून ४, उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ आणि कोळसेवाडी (जि. ठाणे) हद्दीतून १, अशा ७ मोटरसायकली चोरल्याची कबुली या संशयितांनी दिली असून पोलिसांनी या सर्व मोटरसायकलीही जप्त केल्या आहेत. ज्ञानेश उद्वव चव्हाण आणि मनोज मुरलीधर विभुते दोघेही रा. उंब्रज अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
एकाच्या चौकशीत इतर चोऱ्या उघडकीस
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कॉंस्टेबल मारूती लाटणे, विनोद माने आणि तानाजी शिंदे यांना उंब्रजमधील दोघांनी मोटरसायकली चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ज्ञानेश चव्हाण आणि मनोज विभुते यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता कराड, उंब्रज आणि कोळसेवाडी (जि. ठाणे) येथून मोटरसायकली चोरल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी दोघांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
हेही वाचा- सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात; एकाच कुटुंबातील 3 ठार, 13 जण जखमी