सातारा - सातारा-लोणंद मार्गावर शिवथर जवळील इंगवलेवस्ती येथे मोटार सायकल आणि आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे.
तरुण होते ट्रिपलसीट
विशाल कुंभार (वय ३१ रा. मालगाव ता. सातारा) व शंकर क्षीरसागर (वय ३० रा. रविवार पेठ, सातारा) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. या अपघातात जीवन पवार (रा. रविवार पेठ, सातारा) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी सांगितले की, मृत विशाल कुंभार, शंकर क्षीरसागर व जखमी जीवन पवार हे मोटार सायकलवरून वाठारस्टेशन बाजूकडून साताऱ्याकडे येत होते. त्याच वेळी सातारा बाजूकडून आयशर टेम्पो लोणंदकडे निघाला होता.
दोघांचा जागीच मृत्यू
दोन्हीही वाहने शिवथर गावाजवळील इंगवलेवस्ती जवळ आली असता, त्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटार सायकलवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव व हवालदार महाले हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रथम जखमीला येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने रत्याच्या बाजूला केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हा अपघात एवढा भिषण होता की, रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याचे दिसत होते. अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशीरा पर्यंत सुरू होते.
हेही वाचा - पुण्यातील एका डॉक्टरचा घरात आढळला मृतदेह; तर बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू