सातारा - कराड शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना एका वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. अमित हणमंत कदम (रा. विद्यानगर-कराड) आणि शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (रा. हजारमाची, ता. कराड), अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. दरम्यान, कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दोन डझनहून अधिक झाली आहे.
पोलीस अधिक्षकांनी दिले आदेश -
सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया मोडीत काढून कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत 12 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. अमित कदम आणि शेखर उर्फ बाळू सुर्यवंशी याच्या हद्दपारीचा प्रस्ताव कराडचे पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे सादर केला होता. त्यावर निर्णय देताना बन्सल यांनी दोन्ही गुन्हेगारांना एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
दोन्ही गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, हवालदार नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, विनोद माने यांनी तयार करून हद्दपार प्राधिकरणापुढे सादर केले होते.