सातारा - पोवई नाक्यावर झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळला (केएसआरटीसी) मोटार अपघात न्यायाधिकरणाने दणका दिला आहे. न्यायालयीन आदेशाने कर्नाटकच्या दोन बस सातारा आगारात आज जप्त करण्यात आल्या आहेत.
अॅड. यशवंतराव वाघ यांनी मृतांच्या नातेवाईकांतर्फे खटला चालवला. अॅड. वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये पोवईनाक्यावर कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या (केए 22 1961) धडकेने दुचाकीवरील रवींद्र तानाजी लावंड आणि त्यांची मुलगी श्रृती यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात बसचालकाच्या चुकीमुळे झाल्याचे सिद्ध झाले. तसेच चालकाला न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली; आणि लावंड कुटुंबाला नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला.
हेही वाचा VIDEO: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिला चोर सक्रिय; सीसीटीव्हीत चोरी कैद
परंतु, कर्नाटक महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. कर्नाटक महामंडळाने सहा आठवड्यात नुकसान भरपाईची सर्व रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तरीही कर्नाटक महामंडळाने आजपर्यंत रक्कम भरली नाही. तसेच तडजोडीच्या प्रस्तावाची दखल घेतली नाही. यामुळे सातारा न्यायालयात कर्नाटक राज्य महामंडळाच्या मालकीच्या बसेस जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले; आणि त्याचा लिलाव करण्यास सांगितले.
हेही वाचा २०२१ च्या सुरूवातीला होऊ शकते चांद्रयान-३ चे प्रक्षेपण; सरकारची माहिती..
लावंड कुटुंबीयांना देय असलेली 20 लाख 78 हजार 465 रक्कम तसेच नऊ लाख 59 हजार 257 रुपये व्याजासह वसूल होऊन मिळावेत यासाठी जुलै 2019 मध्ये अर्ज करण्यात आला होता. त्यावर सातारा येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य आणि जिल्हा न्यायाधीश ए.जे. खान यांनी एसटी बस जप्त करण्याचा आदेश दिला. यानुसार बुधवारी कर्नाटक महामंडळाच्या एसटी बसेस जप्त करण्यात आल्या आहेत.