कराड (सातारा) - चरबी लावलेल्या गावठी बाँबने रानडुकराची शिकार करणाऱ्या चौघांपैकी दोघांना वनरक्षकांनी गुरूवारी सकाळी बेलदरे (ता. कराड) येथील शेतात पकडले, तर दोघे पळून गेले. घटनास्थळावरून डुकराचे मांस आणि हत्यारे वन खात्याने जप्त केली आहेत. नामदेव महादेव चव्हाण, गोरख आप्पासो जाधव या दोघांना वनरक्षकांनी जागीच पकडले, तर दीपक सुनिल खांबे आणि अविनाश जालिंदर जाधव हे पळून गेले, त्यांचा शोध सुरू आहे.
बेलदरे गावातील नाईकबा देवस्थान परिसरातील शेतात गावठी बाँबने डुकराची शिकार करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनरक्षक अशोक मलप, खटावकर व रोजंदारी मजूर हे त्वरीत घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी शिकार केलेले रानडुकर भाजून त्याचे मांस तोडले जात होते. वनरक्षकांना पाहताच दोघेजण पळून गेले आणि दोघे तावडीत सापडले. संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन डुकराचे मांस आणि हत्यारे जप्त करण्यात आली. वन्यजीव (संरक्षण) अधिनियमान्वये चारही संशयीतांवर गुहा नोंद करून दोघांना अटक केली आहे.