सातारा - जिल्ह्यात जूनपासून खरीप हंगामासाठीची लगभग सुरू झाली आहे. शेतकरी वर्ग खते, बी-बियाणे खरेदीसाठी दुकानात धाव घेत आहेत. मात्र, व्यापारीवर्ग चढ्या दराने खते, तसेच बियाणे शेतकऱ्याच्या पदरात टाकत आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर टंचाई असल्याचे सांगत पावती न देता शेतकऱ्यांना गंडा घालण्याचा फंडा व्यापारी वापरत असल्याचे समोर येत आहे.
शेतकरी ग्राहक दुकानात शासन मान्यता प्राप्त कंपनीच्या बी-बियाणे तसेच खतांची मागणी करीत आहेत. मात्र, व्यापारीवर्ग जास्त पैसे मिळणारे बी-बियाणे आणि खते शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय बियाणांची अधिकृत खरेदी पावती मागितली असता कोरोनाचे कारण पुढे करीत पावती देण्यासाठीही काही व्यापारी टाळाटाळ करत आहेत. सोबतच पावतीची मागणी करणाऱ्यांना बियाणे दिले जात नाहीत. अनेक शेतकरी याबद्दलची तक्रार करत आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सभागृहात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सभा घेण्यात येते. या सभेस आधिकारी, पदाधिकारी, लोकनेते उपस्थित राहून मार्गदर्शन करतात. कागदोपत्री सर्व व्यवस्थित व सुरळीत अधिकृत होत असते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांची होणारी लूट याबाबत काहीही पाऊले उचलली जात नाहीत. खरेदी पावती मागितली म्हणून शेतकऱ्यांच्या पदरातील माल व्यापारी माघारी घेत आहेत. मात्र, यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे, शेतकरी ग्राहकाने केलेल्या रीतसर तक्रारींचे निवारण व्हावे आणि टंचाई भासवून जास्त दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.