सातारा - रागाने बघण्यावरून झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने भोसकून 22 वर्षांच्या युवकाचा खून करण्यात आला. ओगलेवाडी (ता. कराड) येथे आज (दि. 25 जानेवारी) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नरेंद्र अनिल कदम (वय 22 वर्षे, रा. हजारमाची, ता. कराड), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून प्रकरणी एका वकिलासह तिघांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर ओगलेवाडीत तणाव निर्माण झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
एकमेकांकडे रागाने बघण्यावरून नरेंद्र कदम व अन्य एका युवकामध्ये ओगलेवाडी येथे आज सकाळी वादावादी झाली होती. हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला होता. परंतु, सायंकाळी 5 वाजता पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. या भांडणात नरेंद्र कदम यास एकाने धारदार शस्त्राने भोसकले. यात नरेंद्र हा जागीच ठार झाला. घटनास्थळी मोठा जमाव जमला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नरेंद्रला जमावातील काही युवकांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - ..म्हणून मित्राने तानाजीला घाटातच संपवले, अन् रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव
खुनाच्या घटनेमुळे ओगलेवाडीत तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक सूरज गुरव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाट्यासह ओगलेवाडीत दाखल झाले. जमावाला पांगवून तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील हे सुध्दा तातडीने कराडात दाखल झाले. त्यांनी ओगलेवाडीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. खूनप्रकरणी कराड शहर पोलिसांनी एका वकिलासह तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती.
हेही वाचा - 'स्विगी'चा 'डिलिव्हरी बाॅय' निघाला चोरटा; साताऱ्यातील ४० घरफोड्यांची कबुली