सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून मोडून सांगण्याची नवीन फॅशन व्हायला लागली आहे असे सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की सध्या राजकीय हेतू ठेवून औरंगजेब, अफजल खानाचे उदात्तीकरण करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. कोणीही उठतो आणि मनाला वाटेल ते बोलतो. अशा लोकांनी महाराष्टात राहू नये,अशा शब्दांत त्यांनी इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना सुनावले आहे. चर्चेत यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तोडून मोडून सांगण्याची नवीन फॅशन व्हायला लागली आहे. असेही त्यांनी म्हणले आहे. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.0
दैवताचे महत्त्व कमी करतोय : इतिहासात नोंद असलेल्या गोष्टींवर वेगळ्या पद्धतीने टीका, टीपण्णी करून चर्चेत येणे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमान आहे, ते आमचे दैवत आहेत, असे म्हणतो. मात्र, आता आपणच त्यांचे महत्त्व कमी करत असल्याचे जाणवु लागले आहे, असा उद्वेगही शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला.
त्यांनी महाराष्ट्र सोडावा : शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, राजकीय हेतू ठेवून औरंगजेब,अफजल खानाचे कोणी उदात्तीकरण करत असेल तर ते योग्य नाही. अशा लोकांनी महाराष्ट्रात राहू नये. त्यांनी महाराष्ट्र सोडावा. प्रतापगड येथील अफझल खान वधाचा विषय इतिहासाची उंची कमी करायला लागला तर ती चुकीची गोष्ट आहे. हे सर्व मतांसाठी होत असेल तर ते महाराष्ट्राला अशोभनीय आहे.
उदयनराजेंची भूमिका त्यांनाच माहीत : राज्यपालांकडून शिवाजी महाराजांचा झालेल्या अवमानाबाबत उदयनराजे भोसले यांच्या भुमिकेबद्दल विचारले असता आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, मला त्यांच्या राजकीय गोष्टीवर टीप्पणी करायची नाही. या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेतला जाईल. खासदार उदयनराजे यांचे काही राजकीय अंडरस्टॅंडिंग असेल तर मला माहिती नाही.
वक्तव्यावरून वादाची मालीका : शिवाजी महाराजांवर राज्यपालांनी वक्तव्य केले आणी वाद सुरु झाला. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या महाविकास आघाडीने या विषयी मोर्चा काढून शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना बदला अशी मागणी लावुन धरली. दरम्यान अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल मत व्यक्त केले. भाजपने त्यावर आक्षेप घेत अनेक ठिकाणी मोर्चे काढत निषेध नोंदवला. महापुरषांवरील वक्तव्य आणि वाद असे समिकरण झाले आहे. त्यावर तीव्र पडसाद उमटत आहेत.