सातारा - दिवाळीचे साहित्य खरेदीसाठी ( Diwali shopping) आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी १० तोळ्याचे दागिने लंपास ( Jewelry stolen from woman purse ) केले. चोरीच्या घटनेपुर्वी काही तास आधीच संबंधित महिलेने एका दुकानातून दागिने खरेदी केले होते. या घटनेची नोंद शनिवारी रात्री उशीरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात ( Jewelry stolen from woman purse ) झाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.
सोने खरेदी केल्यानंतर काही तासात चोरी - साताऱ्यातील शिवराज पेट्रोल पंप परिसरात राहणारी एक महिला आपल्या दोन मुलींसोबत शनिवारी दुपारी पंचमुखी मंदिर परिसरातील एका सराफी पेढीत सोने खरेदीसाठी आली होती. महिलेने सुमारे दहा तोळे वजनाची वेगवेगळ्या आकारातील वेढणी खरेदी केली. ती पर्समध्ये ठेऊन दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गेली. शनिवार पेठेतील एका चौकात खरेदी करत असताना मुलीला आईच्या पर्सची चेन उघडी असल्याचे दिसले. तिने आईला सांगितल्यानंतर महिलेने पर्समध्ये पाहिले असता सोन्याच्या वेढण्यांची पिशवी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
गर्दींचा फायदा घेत चोरट्यांनी लांबवले दागिने - बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पर्सची चेन उघडून आतील सुमारे दहा तोळ्याच्या वेढण्यांची पिशवी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शाहुपुरी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्या परिसरातील फुटेज तपासणीचे काम सुरू केले. रात्री उशीरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद झाली.