सातारा - व्हायरस कोणत्या कालावधीत बाहेर येतो कोणत्या कालावधीत झोपलेला असतो, हे आपण सांगू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी. मात्र, जर प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केले असते तर, आज लसीचा तुटवडा जाणवला नसता, असे मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात लस हवी -
राज्यात सध्या करोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्राला कमी दिली आणि दुसऱ्या राज्याला जास्त दिली, असा वाद निर्माण करू नका. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या क्षमतेप्रमाणे लस दिली पाहिजे. लसीच्या पुरवठ्यासाठी मी आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले.
लसीबाबत दुजाभाव नाही -
लसीबाबत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते आहे. मात्र, केंद्र सरकारवर बोट दाखवून काही उपयोग नाही. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कितीही लस मिळाली तरी कमीच पडणार आहे. लसीबाबत गुजरात व महाराष्ट्रात दुजाभाव केला जाते आहे, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे भोसले म्हणाले.
भिडे गुरूजींवर भाष्य टाळले -
भिडे गुरूजींच्या वक्तव्यावर उदयनराजेंना विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. 'माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका', असे उत्तर उदयनराजेंनी दिले.
हेही वाचा - कोरोनामुळे पुढे ढकलली एमपीएससी तर १०वी, १२वीचा निर्णय लवकरच