कराड (सातारा) - पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी काले गावातील एका घरात बिबट्या घुसल्याच्या घटनेनंतर दोन बछड्यासह मादी बिबट्याचे शनिवारी (दि. 2 जाने.) रात्री पुन्हा एका बंगल्याच्या आवारात दर्शन झाले. भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने कोंबड्यांचे खुराडे उचकटण्याचा प्रयत्न केला. पण, महिलांनी आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली.
काले गावातील गांधीनगरमध्ये खाशाबा यादव यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या वावरत होता. भक्ष्यांच्या शोधात आलेल्या बिबट्याने बंगल्याच्या आवारातील कोंबड्यांचे खुराडे उचकटण्याही प्रयत्न केला. यावेळी राणी यादव यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने केळीच्या बागेत धूम ठोकली. तासाभराच्या अंतराने उसाच्या शेतातून दोन बछडे बाहेर येताना शितल यादव यांना दिसले. या घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली.
वनपाल सव्वाखंडे हे वन कर्मचार्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे मिळाले. दोन दिवसांपूर्वी याच वस्तीवरील एका शेळीचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यानंतर त्याच परिसरात बिबट्या भक्ष्याच्या शोधात आल्याने काले गावात भीतीचे वातावरण आहे. काले ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा - कर्ज देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच व मोबाईल अॅप्सपासून रहा सावध; आरबीआयचा इशारा
हेही वाचा - पोलीस अधीक्षक बन्सल यांना केंद्र व राज्याचा सन्मान