सातारा : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही. माझा कोणताही संबंध आढळल्यास आपण राजकारण सोडू, असा खुलासा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. सुषमा अंधारेंनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य चोवीस तासात मागं घ्यावं, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे.
भुसे, देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी : ललित पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजलीय. यासंदर्भात शंभूराज देसाई आक्रमक झाले आहेत. समाजात आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. वकिलांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शंभूराज देसाईंनी दिला आहे.
अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद : शंभूराज देसाई म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणी केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे. माझा त्या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही. अंधारे या बेजबाबदार वक्तव्य करून समाजात माझी प्रतिमा खराब करत आहेत. कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करून अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार आहे.
अंधारेंच्या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ : सुषमा अंधारे यांनी सकाळी पुण्यात माध्यमांशी बोलताना ललित पाटील प्रकरणात दादा भुसे, शंभूराजे देसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी तातडीनं उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी देसाईंनी अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.
ललित पाटीलला ठोकल्या बेड्या : ड्रग माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यावर ललीत पाटील यांनी खळबळजनक दावा केलाय. मी पळून गेलो नसून, मला पळवून लावण्यात आल्याचा खुलासा ललित पाटील यांनी केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्राची संकल्पना घेऊन गुन्हे नियंत्रण परिषद घेण्यात आली. पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. यामुळंच ललित पाटीलला अटक करण्यात यश आलं आहे, अस फडवीस यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis On Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, कोणालाही...
- Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर
- Lalit Patil Arrest : स्कॉर्पियोने पुणे ते कर्नाटकपर्यंत फिरला ललित पाटील अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात