सातारा - महिलांसाठी समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवली जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या नूतन 'पोलीस मदत केंद्राचा' शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने निर्भया पथकांतर्गत विद्यार्थिनींना कायदे आणि करिअरविषयी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, मला दुष्काळी भागाची जाण आहे. या भागात बुद्धिमत्तेची खाण आहे. बुद्धिमत्ता ही ठराविक भागाची मालमत्ता नाही. तसेच बुद्धिमत्ता स्वतःला सिद्ध करते. त्याचा चांगला वापर करावा. इथे बुद्धिवादी वर्ग मोठा असल्याने संपूर्ण राज्याचा माण खटाव तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तसेच महिला, मुलींवर कोणी अन्याय करीत असेल तर त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. समोरचे कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्याला धडा शिकवायचा आणि अन्याय का सहन करायचा, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - ६०० लोकवस्ती असलेल्या गावाने राबवला प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी प्रयोग
निर्भया पथकाच्या माध्यमातून लवकरच सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाईल, असा विश्वास अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालय विद्यार्थिनी, प्रवासी, तसेच अनेक करिअर अकॅडमी विद्यार्थी उपस्थित होते.