सातारा - पर्यावरणप्रेमी सातारकरांसाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (world environment day) एक सकारात्मक बातमी आहे. ऊर्जा, पाणी व घनकचरा याबाबत सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण हलका करणाऱ्या हरित इमारतींना घरपट्टीत सवलत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात 43 मतदारांना याचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
साता-यातील 'हरित इमारतीं'च्या मिळकतदारांना विशेष सवलत हरित इमारत म्हणजे हिरवळ नाही याबाबतचा ठराव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यात मान्यता घेऊन या 43 पात्र मिळकतदारांना घरपट्टीत सुमारे दहा हजार रुपये सवलत मिळणार आहे, असे सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्पष्ट केले. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सातारकरांसाठी या सवलतीला विशेष महत्त्व आहे. हरित इमारत म्हणजे इमारती सभोवती हिरवळ नसून रेन वॉटर, कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पाणी बचत यासारख्या पाच निकषांची पूर्तता करणे अभिप्रेत आहे. योजनेची पार्श्वभूमी देशातील एकूण विजेच्या मागणीपैकी तब्बल 60 टक्के वीज विविध इमारतींमध्ये दैनंदिन गरजांसाठी वापरात येते. पुढील 20 वर्षांत ही मागणी 80 टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या विजेत बचत करता आली तर सक्तीचे भारनियमन, वीज निर्मितीसाठी खर्च होणारे इंधन, त्यामुळे होणारे प्रदूषण, आदी अनेक प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. त्याचबरोबर पर्जन्यजल पुनर्भरण, वृक्ष संवर्धन आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सांडपाण्याचा पुनर्वापर या माध्यमातून पर्यावरण रक्षण या बरोबरच सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. कोणाला मिळणार सवलत सातारा पालिकेने हरित इमारतींना प्रोत्साहन देण्याकामी 2014 मध्येच पावले उचलली. मात्र नंतरच्या काळात केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे पालिकेचा ठराव दीर्घकाळ रखडला होता. मुख्याधिकारीपदी पुन्हा आल्यानंतर गेल्या काही महिन्यात अभिजीत बापट यांनी योजनेला गती देत पालिकेने अशा इमारतींची पाहणी केली. "त्याचा अहवाल पालिकेच्या नजीकच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. सवलतीस पात्र अर्जदारांच्या 43 मिळकतदारांना लवकरच घरपट्टी तब्बल वीस टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल असे अभिजित बापट यांनी स्पष्ट केले. अशी आहे योजना ऊर्जा बचतीसाठी केलेली उपाययोजना व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण- संवर्धन व ओल्या कचऱ्यातून गच्चीवरील बाग करणे, पाणी वापरात काटकसर व सांडपाण्याचा पुनर्वापर करणे अशा चार प्रकारच्या उपाययोजनांना घरपट्टीत प्रत्येकी पाच टक्के सवलत देण्याचा ठराव सातारा पालिकेने यापूर्वीच मंजूर केला आहे. पालिकेचे सकारात्मक पाऊल हरित इमारतीबाबत पालिकेने उशीरा का होईना उचललेले पाऊल महत्वाचे आहे. येत्या वर्षभरात या 43 मिळकतींच्या चार हजार मिळकती व्हाव्यात. ऊर्जा बचतीच्या माध्यमातून सातारकर पर्यावरण रक्षणाला साथ देतील आणि सवलतींचा अधिक लाभ घेतील, अशी अपेक्षा पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, माजी सैनिक शंकर माळवदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.