सातारा - कराड तालुक्यातील आणखी ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे एकट्या कराड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३० झाली आहे. तर, जिल्ह्यात एकूण ३४ कोरोनाबाधित रुग्णापैकी आत्तापर्यंत ५ कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात कराड तालुका कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी करखब, मलकापूरसह परिसरातील १३ गावे पूर्ण सील केली आहेत. परंतु, कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच आज(मंगळवार) आणखी ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कराड तालुका हादरुन गेला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा आकडाही खूप वाढला आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताणही वाढत चालला आहे. तर, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे.