सातारा - राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात आयआयटी कोचींग क्लासेससाठी गेलेले २ हजार ५०० विद्यार्थी व काही पालक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. यात सातारा जिल्ह्यातील ३५ जण आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून महाराष्ट्र सरकारने या लोकांना तातडीने महाराष्ट्रात आणावे, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सुमारे 2 वर्षांपूर्वी आयआयटीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातून २ हजार ५०० विद्यार्थी आणि काही पालक कोटा जिल्ह्यात गेले आहेत. लॉकडाऊनमुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे ते सर्व अडकून पडले आहेत. त्यांचे अतोनात हाल होत आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अडकून पडलेले विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या राज्यात परतण्याची परवानगी दिली आहे.
उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांनी त्यानुसार आपल्या नागरिकांसाठी कार्यवाही केली. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षाही शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली.