सातारा - साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदि शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. तर श्वेता सिंघल यांची पुणे येथे पदोन्नतीवर अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर बदली झाली आहे.
मंत्रालयातून सामान्य प्रशासनाच्या वतीने भारतीय प्रशासन सेवेतील 19 पैकी काही वरिष्ठ श्रेणीच्या बदल्या आज (गुरुवारी) दुपारी जाहीर करण्यात आल्या. पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून श्वेता सिंघल यांची पदोन्नतीने बदली झाली असून त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना आहेत. एप्रिल, 2017 मध्ये श्वेता सिंघल यांनी जिल्हाधिकारी पदाचा भार सांभाळला होता. त्यांची येथील कारकिर्द 21 महिन्यांची राहिली.
हेही वाचा - 'कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार'
साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे 2016 च्या बॅचचे अधिकारी असून देश पातळीवर त्यांनी 306 वा क्रमांक पटकावला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सिंह यांची 2018 मध्ये गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली होती. तेथील प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्यावर शेखर सिंह यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या नात्याने जवाबदारी आली आहे. येत्या काही दिवसात नवे जिल्हाधिकारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - दोन हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदार 'एसीबी'च्या जाळ्यात