सातारा: शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यापासून राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. त्याची कंपने अजून जाणवत आहेत. याच संदर्भात शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक विधान केले आहे. वजीर ४० आमदार घेऊन चालला होता. म्हणूनच पवारांनी राजीनामा दिलाय, असा दावा त्यांनी केला आहे.
पक्ष टिकविण्यासाठी राजीनामा: शरद पवार साहेब हुशार आहेत. वजीर निघून जाणार असल्याचे असल्याचे त्यांना कळले होते. पक्ष टिकवण्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला. नामशेष होण्याच्या मार्गावर राष्ट्रवादीची वाटचाल आता सुरू झाली आहे. ४० आमदारांसह त्यांचा वजीर गायब होणार होता आणि तो होणारही आहे, असे ठाम वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.
एका घरात दोन मुख्यमंत्री होणार कसे? राष्ट्रवादी पक्षात धुसफूस आहे, हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे; परंतु एका घरात दोन मुख्यमंत्री होणार कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. असे सांगत पवारांच्या राजीनाम्यावर आमदार महेश शिंदेंनी खोचक टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंवर निशाणा: ज्या जमिनीवर आपण उभा होतो ती जमीनच आपली नाही, हे उद्धव ठाकरे यांना कळायला लागले आहे. ती जमीनच विकली गेलीये. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ होतीच कुठे? वज्रमूठ करायला अंगात ताकद लागते, अशा शब्दात शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवारांचे मत: तुम्हाला बोलूनच निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तो मी घेतला नाही. मात्र, तुम्हाला विचारून निर्णय घेतला असता तर तुम्ही तो घेऊ दिला नसता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. त्याचवेळी ते असही म्हणाले की, तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्याचा विचार करून दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल. तुम्हाला असे बसण्याची वेळ येणार नाही. तसेच, जो काही निर्णय होईल तो आपल्या भावनांचा आदर करूनच घेतला जाईल असा शब्द पवार यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे. आज पवार वाय बी सेंटरमध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.