सातारा - कराडच्या धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसेही वर्ग केले आहेत. कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी याबद्दलची माहिती दिली. कोरोनाच्या संकट काळात जयवंत शुगर्सने दुसरा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2019-2020 च्या गळीत हंगामात कारखान्याने 134 दिवसात एकूण 5 लाख 62 हजार 777 मेट्रीक टन उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा 13.05 मिळाला, तर 6 लाख 71 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन केले. कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पात 95 लाख 8 हजार लिटर अल्कोहोलची निर्मिती करून त्यातून 80 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे. या इथेनॉलची विक्री विविध ऑईल कंपन्यांना करण्यात आली असल्याचे डॉ. सुरेश भोसले म्हणाले.
जयवंत शुगर्सने एफआरपीच्या 2939 रूपयांमधील 2500 रूपयांचा पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुर्वीच अदा केला आहे. आता एफआरपीमधील 200 रूपयांचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. सध्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा हा यामागचा उद्देश आहे.