सातारा- राज्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संचारबंदीही लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भीती पसरली आहे. त्यातच सातऱ्यात एक कुटुंबात कोरोनाची लागण झाली आहे. अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बाबा घाडगे असे कारवाई झालेल्याचे नाव आहे.
हेही वाचा- 'कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, यास पुरावा नाही' - चीनी दुतावास
करंजे पेठेत राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याची माहिती त्याच्याच घरासमोर राहणाऱ्या व्यक्तीला व्हाटस्अॅप वर आली. त्याने ती संबंधित व्यक्तीला पाठवून खातरजमा केली. मात्र, हा मॅसेज खोटा असून बाबा घाडगे नावाच्या व्यक्तीने ही खोटी माहिती पसरवली असल्याचे उघड झाले.
असाच दुसरा प्रकार बुधवार पेठेतही घडला. एका कुटुंबात कोरोनाचा रुग्ण आहे. त्याचा वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, अशा आशयाचा हिंदी मेसेज वाॅटस्अॅपवर फिरत आहे. काही जागरुक नागरिकांनी संबंधित व्यक्तीला फोन करुन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पीडित दोन्ही कुटुंबांनी शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी दोन्हा व्यक्तीवर कारवाई केली आहे.
कोरोना बाबात जिल्ह्याभरात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सातारा पोलीस अशा अफवांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगितले आहे.