सातारा : सातारा नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा 'डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार' ( Dr Narendra Dabholkar Memorial Social Award ) घोषित झाला आहे. प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर ( Actor Nana Patekar ) आणि मकंरद अनासपुरे ( Actor Makarand Anaspure ) यांच्या 'नाम फौंडेशन' आणि प्रसिध्द उद्योजक 'भारत फोर्ज'चे सर्वेसर्वा बाबासाहेब कल्याणी ( Bharat Forge Director BabaSaheb Kalyani ) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सातारा नगरपालिकेतर्फे गेल्या आठ वर्षापासून 'डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार' दिला जातो. परंतु, कोरोनामुळे या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास विलंब झाला होता. याबाबत बोलताना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, "एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार दोन वर्षांचे असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे वितरण करण्यात आले नव्हते. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात येणार आहे."
जिल्ह्यात कल्याणी यांचे प्रभावी कार्य
बिट्स पिलानीमधून शिक्षण आणि अमेरिकेतील 'मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून' एमएस पूर्ण केलेले 'भारत फोर्ज'चे सर्वेसर्वा बाबासाहेब कल्याणी ( Bharat Forge Director BabaSaheb Kalyani ) हे मुळचे कराड तालुक्यातील कोळे येथील आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव या तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये 'भारत फोर्ज'च्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रमांतर्गत त्यांनी प्रभावीपणे कार्य केले. साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी हायस्कूलला त्यांनी स्वत:ची जमीन दिली आहे. नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठीही त्यांनी स्वत:ची जमीन अवघ्या एक रुपया किंमतीत दिली आहे.
'नाम फौंडेशन'ची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत
अभिनेते नाना पाटेकर ( Actor Nana Patekar ) आणि मकरंद अनासपुरे ( Actor Makarand Anaspure ) यांनी २०१५ साली 'नाम फौंडेशन'ची स्थापना केली. या दोघांकडून वैयक्तिक पातळीवर विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. २०१५ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि अन्य साहित्याचेही वाटप 'नाम फौंडेशन'च्या माध्यमातून करण्यात आले.