सातारा - सार्वजनिक बांधकाम विभागाचे दीर्घकाळ रेंगाळलेले रस्ते प्रकल्प यावेळी सातारा जिल्ह्यात वेगळ्या अर्थाने चर्चेत आले आहेत. या विभागाने 24 तासात 39 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्यातच आता असा विक्रम 24 तासात नको, पण किमान 24 महिन्यात तरी इतर रस्ते पूर्ण करून नोंदवावा, अशी अपेक्षा सातारकरांतून व्यक्त होत आहे.
शासन सातारकरांचे आव्हान स्वीकारणार?
पुसेगाव-औंध-गोपूज-म्हासुर्णे या सुमारे 39 किलोमीटर अंतरातील डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सलग 24 तासात पूर्ण करण्यात आले. यामुळे एक आगळा वेगळा उच्चांक साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्थापित केला. या विक्रमाचा राज्यस्तरापर्यंत बोलबाला झाला. सातारकरांनी मात्र समाज माध्यमांमध्ये वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया नोंदवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवे उच्चांक प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे. पुसेगाव- म्हासुर्णे रस्त्याचा विक्रम करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग सातारकरांचे हे आव्हान स्वीकारणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
खडखड, धडधड अन् उडणारी धूळ
या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने सातारा जिल्ह्यातील सातारा- महाबळेश्वर, सातारा-रहिमतपूर, सातारा-कास या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामांचा आढावा घेत नागरिकांची मते नोंदवली. स्थानिक रहिवाशांच्या भावना टोकदार व तितक्याच वस्तूस्थिती दर्शविणाऱ्या दिसल्या. महाबळेश्वर-सातारा हा दीर्घकाळ रेंगाळलेल्यांपैकी एक रस्ता आहे. कोंडवे येथील ग्रामस्थ मंगल घाडगे साताऱ्यात रोज याच रस्त्याने ये-जा करतात. त्या म्हणाल्या, की "दोन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू असल्याचे आम्ही पाहतोय. खडखड, धडधड आणि उडणारी धूळ, असा हा रस्ता आहे. यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नको वाटतेय. आणखी किती महिने या रस्त्याला लागणार आहे?".
तर, 'जन्मापासून हा रस्ता आहे तसाच खराब पाहतोय. या रस्त्याने सुख काही लागू दिले नाही', अशी प्रतिक्रिया हमदाबाज (ता. सातारा) येथील मानसिंग ढाणे यांनी दिली आहे.
'खराब रस्त्याचे भूत कधी उतरणार?'
कोडोली हे साताऱ्याचे उपनगर. औद्योगिक वसाहतीकडे जाणारा एक रस्ता कोडोलीतून जातो. त्यामुळे या रस्त्यावर रहिमतपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसह औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या नागरिकांची कायम वर्दळ असते. कोडोलीत राहणारे किशोर भोसले या रिक्षाचालकाने सांगितले, की "अजंठा हॉटेल चौक ते कोडोलीतून रहिमतपूरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब आहे. मला व्यवसायानिमित्ताने रोजच या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. उन्हाळा-पावसाळ्यात खड्ड्यांच्या या रस्त्यातून वाट शोधावी लागते. मोठा ट्रक समोरून आला तर प्रचंड धुळीचे लोट नाका-तोंडात, डोळ्यात जातात. त्यातून स्वतःला वाचवत मार्ग काढावा लागतो. रस्त्याचे काम रहिमतपूरपर्यंत आले, धामणेरपर्यंत आले, अशी चर्चा अधूनमधून ऐकायला मिळते. मात्र, दोन वर्षे झाले या खराब रस्त्याचे भूत आमच्या मानगुटीवरून अद्याप उतरलेले नाही".
"हे किती दिवस चालणार?"
'सातारा-कास या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र बोगदा ते यवतेश्वर हा रस्ताच अद्याप झालेला नाही. बोगदा, पॉवर हाऊस या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्याचा त्रास रोज सहन करावा लागतो', अशी तक्रार विनायक गोरे (रा. मंगळवार पेठ) यांनी व्यक्त केली. 'दोन अडिच वर्षे झाली हे काम सुरू आहे. अजून किती वर्षात हे काम पूर्ण होईल, हे सांगता येत नाही. कास बाजूच्या रस्त्याचे काम सुरू आहे. ते झाले की यवतेश्वर घाटातील काम करणार, असे सांगण्यात येते. तिथले झाले की इथे येणार अन् तोपर्यंत पहिला रस्ता खराब होणार. हे असे किती दिवस चालणार?' असा सवाल श्री. गोरे यांनी उपस्थित केला.
'वृक्षतोडीची घाई, लावताना का नाही?'
'सातारा-महाबळेश्वर, सातारा- रहिमतपूर-वीटा, सातारा-कास या तिन्ही रस्त्यांवर डांबरीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू करताना 50 ते 100 वर्षांपूर्वीची जुनी हजारो झाडे तोडण्यात आली. मात्र, अडिच वर्षांहून अधिक काळ निघून गेला, तरीही नवीन झाडे लावण्याची घाई सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा त्यांच्या अखत्यारीतील ठेकेदारांकडे दिसून आलेली नाही', अशी खंत साताऱ्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते व मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्याची रुंदी एकदा निश्चित झाल्यानंतर वृक्षारोपण व संगोपनाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. आज ही झाडे चांगली मूळे धरून उभी राहिली असती. रस्ता झाल्यानंतर वृक्षारोपण करतो म्हणणारे या रस्त्यांची सातारा-पुणे महामार्गसारखी अवस्था करणार की काय? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - तळीरामांनी 'यूट्यूब' पाहून घरीच बनवली दारू; बाप-लेकाच्या जोडीला अटक