कराड - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी येथे वांग नदीच्या बंधार्यात पोहण्यास गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा बुधवारी (5 मे) दुपारी पाण्यात बुडून मृत्यू झाला. समीर राहूल वाघमारे असे बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मराठवाडी धरणातून तात्पुरता विसर्ग थांबवून रात्री उशीरापर्यंत नदीपात्रात त्याचा शोध घेण्यात आला. परंतु, पाऊस आणि अंधारामुळे अडथळे आल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. आज (6 मे) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास समीरचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
ढेबेवाडी खोर्यातील मराठवाडीच्या नवीन गावठाणात वाघमारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील 10 वर्षांचा समीर हा दुपारी मराठवाडी धरणाजवळच्या वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे अन्य मुलेही पोहत होती. सध्या मराठवाडी धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा तुडुंब भरला आहे. या बंधार्यात पोहताना समीर बुडाला. ही बाब लक्षात येताच अन्य मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविली. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनीही बंधार्याकडे धाव घेतली.
मुलगा बंधार्यात बुडाल्याची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मराठवाडी धरणातील विसर्ग तात्पुरता थांबविण्याची विनंती केली. पोहणार्या युवकांच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात समीरचा शोध घेण्यात आला. परंतु, जोरदार पाऊस आणि अंधारामुळे रात्री शोध मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा नदीपात्रात शोध घेतला. सकाळी साडेनऊच्या दरम्यान त्याचा मृतदेह सापडला.
वाघमारे कुटुंबीय भंगार गोळा करण्याबरोबरच मोलमजुरीवर आपला चरितार्थ चालवितात. समीर हा पाचवीत शिकत होता. मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने वाघमारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरण : शुक्ला यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु
हेही वाचा - 'सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे केलेले कौतुक ही विरोधकांना चपराक'