सातारा- खटाव तालुक्यातील मांडवे गावात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी एका ठिकाणी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले तर दुसरीकडे एका वयस्कर व्यक्तीच्या शर्टच्या खिशातील रोख रक्कम पळवली. तर एका वस्तीवरील घराचा दरवाजा तोडून अत्याचार करण्याची धमकी देत तीन तोळे सोने हिसकावून दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.
वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मांडवे येथे शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बर्गे वस्ती येथील दादासाहेब फाळके यांच्या राहत्या घरी पाच अनोळखी दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील मुलांना किरकोळ जखमा केल्या आणि साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व १२ हजार रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून नेले. तसेच आंबेमळा वस्ती येथील दिनकर गोविंद खाडे यांच्या माहेरी आलेल्या मुलीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यानंतर पाटील वस्ती येथील राहुल माळवे यांचा मोबाईल व त्यांचे आजोबा व वसंत पाटील यांचे पैसे असलेला शर्ट घेऊन गेले आहेत.
या बाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वनडेरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पूर्ण माहिती घेतली आहे. तपासासाठी पथके रवाना केली आहेत.