सातारा: विखे-पाटील म्हणाले, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा भाजपमुळेच विजय झाला आहे. विजयानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यातून सर्व काही स्पष्ट होते. आमदार सत्यजित तांबे यांनी आता भाजपमथ्ये प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा, अशी भाजप कार्यकत्यांची इच्छा आहे.
अंतर्गत वादाची जबाबदारी घेणार का? नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे कॉंग्रेस पक्षांतर्गत निर्माण झालेल्या वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झाला असल्याचे सांगून विखे-पाटील म्हणाले, पक्षीय वादावर बाळासाहेब थोरातांनी पक्षाध्यक्षाकडे जाऊन भांडावे अथवा राज्याच्या प्रभारीकडे जाऊन भांडावे. परंतु, पक्षांतर्गत वादामुळे महाविकास आघाडीवर झालेल्या परिणामाची जबाबदारी ते घेणार की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कॉंग्रेसने का प्रयत्न केला नाही? नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता. काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असताना काँग्रेसने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, असाही सवालही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
विखे पाटील यांची थोरात यांच्यावर टीका: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, थोरात यांचे हे सोयीचे राजकारण असून, त्यांना स्थानिक पातळीच्या नेत्यांबद्दल नाराजी होती. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला का मदत केली नाही? तेव्हाच का राजीनामा दिला नाही, असा टोला महसूल मंत्री विखे पाटील यांनी 7 फेब्रुवारी, 2023 रोजी लगावला होता. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राजीनामा कशासाठी ? बाळासाहेब थोरात यांना जर पक्षांतर्गत काही अडचण होती तर त्यांनी आपल्या केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाला सांगणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यावेळीच ते आजारी असल्याचे सांगून घरात थांबले मग आता कशासाठी राजीनामा देत आहेत? तेव्हाच राजीनामा का देता आला नाही? हे त्यांचे सोयीचे राजकारण आहे असा टोलाही विखे पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
काँग्रेस अजून टिकून कशी? : या निमित्ताने राज्यातील काँग्रेसला आणखी खिंडार पडण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता विखे पाटील म्हणाले, की वास्तविक राज्यातील काँग्रेस कधीच कमकुवत झाली आहे. खरेतर काँग्रेस इतके दिवस कशी टिकून आहे हा खरा प्रश्न आहे, असेही विखे पाटील म्हणाले आहेत. तसेच, काँग्रेसला राज्यात काहीही भवितव्य नाही हे दिसत असल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांची पळापळ सुरू असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.