सातारा - राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. तरच या मतदारसंघातील दुष्काळ आणि दारिद्री हटविण्यासाठी मदत होईल, असे आवाहन माणदेश जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जे.टी पोळ यांनी केले आहे. दहीवडी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
डॉ.जे.टी पोळ पुढे म्हणाले की, माण विधानसभा मतदार संघ हा कायम दुष्काळी असून येथील जनता गेल्या ५० वर्षात शेती सोडून मिळेल त्या कामांसाठी तालुका सोडून गेली आहे. येथे स्थलांतर व दुष्काळ आजही कायम आहे. ही परिस्थिती बदलविण्यासाठी माणचे पाणी प्रश्न सुटणे गरजेचे आहे. दुष्काळी जनतेला न्याय देण्यासाठी व तालुक्याचे अश्रू पुसण्यासाठी ताकदवर नेत्याची गरज आहे. माण व खटावच्या पाणी योजना, एम.आय.डी.सी यासारखे प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी माण विधानसभा मतदारसंघातूनच उमेदवारी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
माण खटाव मधील विविध पाणी योजना मार्गी लावण्यासाठी ना.चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिहे कठापूर आणि उरमोडीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातही चंद्रकांत पाटील यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे जनतेतूनही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी अनेकांनी फोनवरून पाठिंबा जाहीर केला असल्याचे सांगितले आहे.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माणमधील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना माझ्या प्रेमापोटी मांडल्या आहेत. मी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्या भावना समजून घेतो. नंतरच या विषयावर प्रतिक्रिया देतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ.जे टी पोळ, भाजपाचे माण विधानसभा अध्यक्ष डॉ.महादेव कापसे, प.समिती सदस्य विजय मगर, विजय धुमाळ, अशोक ओंबसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.