कोल्हापूर : शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची ओळख आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. मात्र कितीही साधेपणाने लग्न म्हटल तरी, लगीनघाई आलीच. शेट्टी यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात हजर राहावे लागते. असाच काहीसा प्रकार शेट्टी यांच्याबाबत पहायला मिळाला. राजू शेट्टी यांच्या मुलाच्या विवाहाच्या दिवशीच त्यांच्या कार्यकर्त्याच्या मुलाचा विवाह होता. त्यामुळे शेट्टी यांनी त्यांच्या मुलाचे लग्न असताना देखील कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावून वधू वरास आशीर्वाद दिले. त्यानंतर त्यांनी लग्नात जेवण देखील केले. यामुळे राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांबद्दल असलेले प्रेम दिसून आले आहे.
कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याचा विवाह सोहळा रविवारी बाहुबली येथे अगदी साधेपणाने पार पडला. राजू शेट्टी हे चळवळीतील असल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते त्यांना त्यांच्या परिवारापेक्षाही जास्त जवळचे आहेत. सौरभ शेट्टीचे लग्न रविवारी असतानाच त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस असलेले शिवाजी पाटील यांचा मुलगा विनय याचा विवाह देखील वडगाव येथील हिरा हॉलमध्ये त्याचवेळेस होता. या लग्नात राजू शेट्टी यांनी हजेरी लावावी, असा हट्ट शिवाजी पाटील यांचा होता. मात्र, एका बाजूला आपल्या मुलाचे लग्न आणि दुसऱ्या बाजूला आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मुलाचे लग्न दोन्हीही महत्वाचे असल्याने काय करावे असा मोठा प्रश्न राजू शेट्टी यांच्यासमोर होता. त्यांनी दोन्ही विवाहाकडे लक्ष देत कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाला देखील हजेरी लावली.
कार्यकर्ते आनंदी : शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टी याचा विवाह सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. तर, संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते शिवाजी पाटील यांच्या मुलाच्या लग्नात गेले होते. मात्र, पाटील यांच्या लग्नात राजू शेट्टी नसल्याची उणीव होत होती. म्हणून प्रत्येक येणारा पाहुणा साहेब येणार आहेत की नाही? असे प्रश्न विचारत होते. तर, साहेब आल्याशिवाय 'मी' जेवणार नाही असे शिवाजी पाटील म्हणत होते. यामुळे राजू शेट्टी यांनी आपल्या मुलावर अक्षता टाकून पाटील यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली. त्यांनी पाटील दाम्पत्याला शुभ आशीर्वाद देखील दिले. तसेच कार्यकर्त्या सोबत बसून जेवण केले. यामुळे कार्यकर्ते देखील आनंदी झाले. इतके वर्ष त्यांच्यासोबत काम केल्याचे फळ मला मिळाले अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.