सातारा - पाच वर्षांच्या भाजपच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती. त्यामुळे आम्ही हे सरकार स्थापन केले आहे. चांगले काम करणारे हे भक्कम सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी रोज उठून बोटे मोडली म्हणून हे सरकार बदलत नसते, असा टोला माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला लगावला आहे. ते वाईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमदेवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या निवडणुक प्रचारासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण वाई येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सोयीचे खटले सुनावणीला-
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अर्णब गोस्वामी अथवा कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने सरकारला कोणताही दोष दिलेला नाही. या निकालाचा अभ्यास सुरू आहे. जर काहीही चुकीचे वाटले तर त्याबाबत अपील करता येईल. न्यायालयाने या खटल्यात दिलेल्या निवाड्याबाबत आम्ही काही बोलणार नाही. मात्र, अत्यंत महत्त्वाची प्रकरणे सुनावणीला येणे गरजेचे आहे. तर ३५ हजारपेक्षा जास्त महत्त्वाचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. तरीही न्यायालयाने राजकीयदृष्ट्या सोयीचे खटले सुनावणीला घेतले. त्याला आमची हरकत आहे.
हेही वाचा-विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेस- राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू होईल - नवाब मलिक
लोकशाहीच्या सर्व संस्था मोदींच्या ताब्यात-
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत. पण, हे खटले पुढे सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळच नाही. याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आरोप विद्वेषातून-
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. या सरकारने वर्षभरात चांगले काम केले आहे. कोविडवर नियंत्रण चांगल्याप्रकारे आणले आहे. कोव्हिडचे मोठे संकट असतानाही अनेक निर्णय, शेतकरी कर्ज, अवकाळी पाऊस आदी अनेक विषय थांबलेले नाहीत. विरोधक केवळ द्वेषातून आणि विद्वेषातून आरोप करत आहेत. हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नाही.
सरकारचे मूल्यमापन जनता करेल
महाविकास आघाडीचे सरकार हे भक्कम व चांगले चालणारे सरकार आहे. हे पाच वर्षे पूर्ण करेल. चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जुगलबंदी एक करमणूक आहे. त्यापेक्षा त्याला महत्त्व नाही. मागच्या सरकारने राज्यात कोणताही मोठा प्रकल्प उभारला नाही. शेतकरी आत्महत्येबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्र व्यापार सर्वेक्षण मूल्यांकनात सहाव्या क्रमांकावरून तेराव्या क्रमांकावर घसरल्यामुळे उद्योगधंदे बाहेर जायला लागले होते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होऊन हे स्थान दिल्लीकडे सरकायला लागलेले होते. जर हे सरकार राज्यात पुन्हा आले असते तर महाराष्ट्रात महाराष्ट्र राहिला नसता. त्यामुळे आम्हाला हे सरकार स्थापन करावे लागले. सरकारचे मूल्यमापन करायला राज्यातील जनता समर्थ आहे. यावेळी आमदार मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे व डी. एम. बावळेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात भाजपचे सरकार राज्यात अस्तित्वात येईल, असा नुकतेच दावा केला आहे.