सातारा - देशाला आता हुकूमशाहीची चाहूल लागल्याने लोकशाहीचा दुसरा स्वातंत्र्य लढा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून यशस्वी करा, असे आवाहन कराड दक्षिणमधील महाआघाडीचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराडच्या विठ्ठल चौकात झालेल्या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेच देश चालवत असून, केंद्रातील बाकी सर्व नेते झिरो झाले आहेत, असा टोला लगावला.
तसेच नरेंद्र मोदी व अमित शाह जिल्ह्यात आल्यानंतर देशातील ढासळणाऱया अर्थिक परिस्थितीवर बोलतील, असे वाटले होते. परंतु, या मुद्द्याला सोयीस्कर बगल देत त्यांनी 370 कलमाचे तुणतुणे वाजवल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील एकाही प्रश्नावर त्यांनी भाष्य केले नाही. मात्र, राजकीय वातावरण दूषित करण्यात ते अग्रेसर आहेत, असे चव्हाण म्हणाले.
मतदान दोन दिवसांवर आल्याने उमेदवार ठिकठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घेतलेल्या सभेत मोदींच्या हातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा झाल्याची टीका केली. पुढे बोलताना, नाकर्त्या पक्षाच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करुन देशाला हुकूमशाहीपासून वाचविण्यासाठी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधीपक्षातील देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षात पन्नास शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून सरकारला धारेवर धरले होते. पण, गेल्या पाच वर्षात भाजपच्या काळात साडेसोळा हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंद होत नाही, असा प्रश्न मधुकर भावे यांनी केला. जनतेच्या पैशाने मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा केली असून, दुष्काळ व महापुराकडे दुर्लक्ष केले आहे. जनतेशी निगडीत प्रश्न विचारले की ते फक्त छत्रपतींचा जयजयकार करतात, असेही भावे म्हणाले. यावेळी रामहरी रुपनवर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशवंतराव हापते, शिवराज मोरे उपस्थित होते.