सातारा - महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने स्पर्धा संयोजकांकडून 'कॅश प्राईज' मिळाले नसल्याची खंत व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर साताऱ्यातून बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. साताऱ्यातील विविध राजकीय गटातटांमध्ये बक्षिसाची अहमहमिका सुरू झाली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाच लाख रुपयांचे, तर त्यांचेच समर्थक रक्षक ग्रुपचे नेते सुशिल मोझर यांनी दीड लाखांचे बक्षीस पृथ्वीराज पाटील ( Prizes to Maharashtra Kesari Prithviraj from Satara) याला जाहीर केले. तसेच, खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje bhosale bike prize to Maharashtra Kesari Prithviraj) यांच्या हस्ते नवी बुलेट देण्यात येणार आहे.
शिवेंद्रसिंहराजेंनी साधला निशाना : बक्षिसाच्या स्वरुपात संयोजकांकडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम मिळायला हवी होती, अशी खंत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने व्यक्त केल्यानंतर साताऱ्यातील विविध राजकीय गटांनी पृथ्वीराज पाटील याला बक्षिसे जाहीर केली आहेत. या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले प्रतिस्पर्धी, तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे संयोजक दीपक पवार यांच्यावर निशाणाही साधला आहे.
प्रायोजकांकडून घेतलेले पैसे कुठे आहेत? - शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र केसरी या स्पर्धेच्या संयोजनात सर्वांना सामावून घ्यायला हवे होते. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेल्या मल्लाकडून अशा पद्धतीने नाराजी व्यक्त होणे सातार्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे मग गेले कुठे? असा सवाल अनेक मल्ल आता विचारू लागले आहेत. जिल्ह्यातून व राज्यातून अनेकांनी मदत दिली. जर महाराष्ट्र केसरीलाच ही मदत मिळाली नसेल, तर या पैशाचे काय झाले? पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन माझ्यावतीने पृथ्वीराज पाटील यांना 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे.
पृथ्वीराजला चक्क बुलेट : कै.श्री.छ. प्रतापसिंह महाराज तालीम संघातर्फे पृथ्वीराज पाटील यांना महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बुलेट देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर यांनी सांगितले. रक्षक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य व श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुहातर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आजच रात्री महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी एक लाख ५१ हजार रुपयांची मदत कोल्हापूरला पाठवत असल्याचे रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशिल मोझर यांनी जाहीर केले.
हेही वाचा - Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा