सांगली - विधानपरिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे कडेगावमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी देशमुख यांची भाजप कार्यकर्त्यांनी शहरातून भव्य मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भाजपकडून सांगलीचे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला. अपुऱ्या संख्याबळामुळे काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ पृथ्वीराज देशमुख यांच्या गळ्यात पडली.
बुधवारी पृथ्वीराज देशमुख यांचे त्यांच्या मतदारसंघातील कडेगावात सायंकाळी आगमन झाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्याकडून देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या निमित्त कडेगाव शहरातून पृथ्वीराज देशमुख यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबासह जिल्ह्यातील भाजपचे आणि देशमुख कुटुंबावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशमुख यांच्या निवडीमुळे सांगली जिल्हा बरोबर विशेषतः पलूस-कडेगाव मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातल्य भाजपने एकसंघ होऊन संजयकाका पाटील यांना विजयी करण्यात मोठा वाटा उचलला होता. या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशमुख यांना आमदारकीची गिफ्ट देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पृथ्वीराज देशमुख हे २० वर्षांपूर्वी (१९९७ ते ९९) पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर २० वर्षांनी आमदार पदाची संधी त्यांना मिळाली आहे. ते पलूस कडेगाव तालुक्यात वर्चस्व असणाऱ्या कदम घराण्याचे पारंपरिक विरोधक मानले जातात. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला शह देण्यासाठी देशमुख यांची आमदारकी भाजपला बळ देणारी ठरेल, असेही बोलले जात आहे.
भाजप पक्षात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पक्ष बांधणीचे मोठे काम करुन दाखवले. त्यामुळे विधानपरिषदेच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासाने मिळालेल्या या आमदारकी पदाच्या संधीचे सोने करू, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकंदरित जिल्ह्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता, 'सांगली भाजपसाठी चांगली' असेच म्हणावे लागेल.