कराड (सातारा) - लॉकडाऊन काळात सरकारने पॅकेज जाहीर केल्याबद्दल काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसतानाही मुख्यमंत्र्यांनी सामान्यांना आर्थिक मदतीचा घेतलेला निर्णय क्रांतीकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तर पॅकेजवर टीका करणारे भाजपा नेते दळभद्री असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.
आधी रोजगाराचे पैसे थेट लोकांच्या खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना शिवभोजन थाळी, रिक्षाचालकांना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचा सरकारचा निर्णय क्रांतीकारक आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
सरकारच्या पॅकेजवर टीका करणारे भाजप नेते दळभद्री असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मोदी सरकारने केलेली मदत तुटपुंजी होती. तसेच कुंभमेळ्यात झालेली गर्दी आणि केंद्र सरकारने चुकीच्या पध्दतीने पश्चिम बंगालची निवडणूक हाताळल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार असून या सर्वाला केंद्र सरकार संपूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.