सातारा - देशी, विदेशी दारुची दुकाने बंद असल्यामुळे तळीराम आपला घसा ओला करण्यासाठी सतत दारुचा शोध घेत आहेत. तळीरामांच्या याच अवस्थेचा फायदा घेण्यासाठी बंद पडलेल्या गावठी दारुच्या हातभट्ट्या पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. अशीच एक हातभट्टी दहिवडी पोलीसांनी उध्वस्त केली.
लॉकडाऊन दरम्यान अधिकृत दारु विक्रेते यांच्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे दारु मिळणे अवघड झाले आहे. काहीही करुन कसलीही दारु मिळविण्यासाठी तळीरामांचा आटापिटा सुरु आहे. त्यातही तळीरामांचा ओघ हातभट्टीच्या गावठी दारूकडे वळलेला आहे. दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील राणंद (ता. माण) या गावात अशीच एक हातभट्टी सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दहिवडी पोलिसांनी राणंद गावांमधील अर्जुन चंद्रकांत चव्हाण व बाबा ऊर्फ मनोहर चंद्रकांत चव्हाण या दोघांच्या राहत्या घरी छापा टाकला.
या छाप्यात हातभट्टी आणि त्याकरता लागणारे साहित्य मिळून आले. त्यामुळे त्यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्यात यांना अटक करण्यात आली आहे. या छाप्यात मिळून आलेली हातभट्टी दारू व हातभट्टी दारू करता लागणारे रसायन नष्ट करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे, पोलीस हवालदार संजय केंगले, पोलीस नाईक रविंद्र बनसोडे, पोलीस नाईक मल्हारी हांगे यांच्या पथकाने केली.