सातारा- जिल्ह्याचे तत्कालीन तथा कोल्हापूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्यासह सातारा पोलीस दलातील महिला हेड-कॉन्स्टेबल दया डोईफोडे यांना निवडणूक आयोगाकडून राज्यातील पहिला लोकशाही पुरस्कार देण्यात येणार आहे. देशाचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असताना मुक्त व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडल्या होत्या. याची दखल घेवून राज्य निवडणूक आयोगाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्राच्या आतमध्ये गाडी आणण्यावरुन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व डोईफोडे यांच्यात वाद झाला होता. तेव्हा अनेक उपस्थितांनी चरेगावकर हे मंत्री दर्जाचे नेते असून त्यांची गाडी आत सोडा, अशी डोईफोडे यांना विनंती केली. मात्र कर्तव्य बजावत असलेल्या डोईफोडे यांनी चरेगावकर यांना आत सोडले नव्हते. डोईफोडे यांनी दबावाला बळी न पडता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्याने राज्य निवडणूक आयोगातर्फे आज त्यांचा सन्मान होणार आहे.
पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मुंबई येथे केली होती. हे पुरस्कार उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वितरित करण्यात येणार आहेत.