सातारा - एका शाळेतून बुधवारी १३ वर्षीय मुलीचे एका चारचाकीमधून अपहरण झाले. मात्र, पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवत चारचाकीचा पत्ता लावून या अपहरणाचा डाव उधळून लावला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी पाठलाग करत अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील मुलीला बुधवारी सकाळी तिच्या आईने शाळेत सोडले. मात्र, थोड्या वेळानंतर, मुलगी शाळेत आली नसल्याबाबतचा फोन मुलीच्या आईला आला. या प्रकाराने महिला घाबरून गेली आणि त्यांनी शाळेत जाऊन सीसीटीव्हीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या मुलीचे पांढऱ्या चारचाकीमधून अपहरण झाल्याचे दिसले. मुलीच्या आईने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
सातार्यातील शाळेतून मुलीचे अपहरण झाल्याने पोलीस मुख्यालय, शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस सावध झाले. वायरलेसवरून अपहरण झालेल्या चारचाकीचे वर्णन दिल्यानंतर पोलीस या गाडीचा शोध घेऊ लागले. दरम्यान, मोती चौकात वाहतूक पोलीस हवालदार विनायक मनवी कर्तव्यावर होते. त्यांना अपहरण झालेल्या चारचाकीच्या वर्णनाशी मिळतीजुळती चारचाकी चौकात दिसताच त्यांनी तिचा पाठलाग करत थांबण्यास सांगितले. मात्र, ही चारचाकी थांबली नाही. अखेर मनवी यांना चारचाकी थांबवण्यात यश आले. त्यांनी कारमध्ये पाहिले असता यात अपहरण झालेली मुलगी आणि ३ युवक आढळले.
हेही वाचा - पाटणमध्ये बिबट्याचा हल्ला, थोडक्यात बचावली महिला..
चारचाकी थांबल्यानंतर संशयितांनी पोलिसाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस हवालदार मनवी यांनी झटापट करून युवकांना पकडले. या घटनेची माहिती कंट्रोल रुमला दिल्यानंतर पीसीआर व्हॅन आली आणि संशयितांची धरपकड करुन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, रात्री उशिरा याप्रकरणी मुलीच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात ३ युवकांविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. सर्व संशयित उस्मानाबाद जिल्ह्यातील असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. मात्र, या प्रकाराने परिसर हादरून गेला होता.
हेही वाचा - सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी