सातारा Panchgani Resort Police Raid : थंड हवेचं ठिकाण असलेल्या पाचगणीतील स्प्रिंग व्हॅली रिसॉर्टच्या (Panchgani Spring Resort) तळघरात डॉक्टरांनी बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पाचगणी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा टाकला असता, रिसॉर्टमध्ये चार बारबालांसह डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत बीभत्स नृत्य करताना आढळून आले. याप्रकरणी डॉक्टर्स, रिसॉर्ट मालकासह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : पाचगणी पोलिसांनी रिसॉर्ट मालक विशाल सुरेश शिर्के (रा. पसरणी, ता. वाई), वेटर उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल (रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट कासवंड, ता. महाबळेश्वर), डॉ. रणजीत तात्यासाहेब काळे, डॉ. मनोज विलास सावंत, डॉ. हनुमंत मधुकर खाडे (तिघेही रा. दहिवडी ता. माण), डॉ. निलेश नारायण सन्मुख (रा. लक्ष्मी मार्केट, मिरज), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (रा. मलकापूर, ता. कराड), डॉ. राहुल बबन वाघमोडे (रा. गोंदवले, ता. माण) आणि फार्मसिस्ट प्रवीण शांताराम सैद (रा. माळुंगे-पाडळे, ता. मुळशी) या ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत आढळले : पाचगणीतील कासवंड गावाजवळच्या स्प्रिंग व्हॅली रिसॉर्टमध्ये सांगली आणि पुण्यातून आलेल्या तरूणी ग्राहकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स नृत्य करत असल्याने, ग्राहकांची संख्या वाढली होती. साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यांनी विशेष पथक कारवाईसाठी पाठवले. या पथकाने मंगळवारी मध्यरात्री अचानक रिसॉर्टवर छापा टाकला. यावेळी रिसॉर्टच्या तळघरात डॉक्टर दारुच्या नशेत तरुणींसोबत नाचताना आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मोबाईल, रोकडसह ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त : पाचगणी पोलिसांनी (Panchgani Police) छापा टाकल्यानंतर पोलिसांना रिसॉर्टमध्ये २००० रुपये किंमतीचा ब्लूटूथ ट्रॉली स्पिकर, १२०० रूपये किंमतीचा डीव्हीआर, ९,८०० रूपयांची रोकड, ७० हजार रुपये किंमतीचे मोबाईल हँडसेट, असा एकूण ८३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा -