सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेव येथील काळूबाई देवीची यात्रा आणि वाई तालुक्यातील सुरुरमधील दावजी बुवा यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेसाठी भाविकांनी गर्दी करू नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत मंदिर परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार मांढरदेव येथील काळूबाई देवी मंदिरामध्ये तसेच सुरुर येथील दावजी बुवा मंदिरात भक्तांना गर्दी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मिरवणुक आणि इतर धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम हे केवळ मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्येच पार पाडावेत असे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी यांच्याशिवाय इतरांना दर्शनासाठी मंदिर बंद असणार आहे.
बळी देण्यासही मनाई
यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास, तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. १६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत वाई तालुक्यातील मांढरदेव गावासह गावापासून दहा किलोमिटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी फाटा, रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर, वाई शहर व सुरुर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी या गावांना जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत.